मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

नव्याने रुजताना .....

दरवर्षी मी  मे महिन्यात आंब्याच्या बाटा (कोय) वाळवते आणि पावसाळा सुरु होण्याआधी त्या बाटा रुजवते. (पूर्वीच्या पोस्टची लिंक).  यावर्षी देखील मी बाटा वाळवून, बाजूला प्लास्टिक पिशवी मध्ये काढून बाल्कनी मध्ये ठेवल्या. जून महिन्यात पनवेलला गेलो होतो, तेथून माती आणली. पण बाटा रुजत घालायला शक्य झालं नाही. दरवेळी काहीतरी वेगळच काम यायचं. आणि रविवार पटकन जायचा.

रोज इतर झाडांना पाणी घालताना ती पिशवी आठवण करून द्यायची माझ्या राहिलेल्या कामाची. आज करेन, उद्या करेन असं म्हणता एक, दोन नाही चांगले चार महिने उलटले आणि आज मुहूर्त मिळाला. आज ठरवलं आणि मातीची पिशवी, कुंडी आणि आंब्याच्या बाटांची पिशवी सगळं बाहेर एकत्र केलं.

आंब्याच्या बाटांची ती पिशवी जेंव्हा उघडली तेव्हा आश्चर्य वाटलं ...तीन बाटांना कोंब आले होते आणि पानं सुद्धा आली होती. माती आणि पाणी नसताना देखील बाटांना कोंब आलेला होता. कदाचित पावसाळ्यात हवेत दमटपणा असल्याने बाटांना पूरक वातावरण मिळालं असेल. क्षणभर वाईट वाटलं , यावर्षी उशीर झाला रुजवायला. पण नंतर ते कोंब बघून नवल वाटले.

त्या बाटांमध्ये सकारात्मता दिसली. परिस्थिती प्रतिकूल असताना देखील सकारात्मक आणि आशावादी असणे हेच जीवन आहे असं वाटलं. 

यावर्षी नऊ बाटा / आंब्याच्या कोयरी लावल्या. आणि बऱ्याच दिवसाचं अपूर्ण काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं.

बाटा मातीत रुजवण्या आधी घेतलेले फोटोस शेयर येथे शेयर करत आहे -


ता.क - आज त्या रोपाचा काढलेला फोटो (२ दिवसात झालेली वाढ )-


बुधवार, ४ मे, २०१६

निरपेक्ष दान

एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते.
अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही?

लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला......

हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक
अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.

मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.


दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.

पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.


आता अर्जून अगदी दमून गेला होता.

पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.


शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......


या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले की.....

या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.

लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.

हा विचार आपल्या मनात का आला नाही.....

या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला.....


अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!


तू गर्वाने प्रत्येक.......
गावक-याला सोने वाटू लागलास.

जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!


कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.

त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय.....
गुणगान गातंय......
हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....
शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....
म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.....
सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो तेव्हा
 तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,,
तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,
आणि कर्म हा हिरा आहे,-
हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं,
तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य वाढतं.
(P.s - read this wonderful story on whats app, thought to share on blog )

रविवार, ३ जानेवारी, २०१६

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नूतन वर्षाभिनंदन!!… 
2016….
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे, 
भरभराटीचे, 
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो!!

(या  वर्षीच्या  माझ्या  संकल्पानुसार महिन्यातल्या पहिल्या  आणि  तिसर्‍या शुक्रवारी ब्लॉग वर  नवीन लेख पोस्ट होईल. )

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

अंगठी, पैज आणि इच्छाशक्ती ......

पोस्ट चे शीर्षक वाचून वेगळे/ विचित्र वाटले असेल ना ?  अंगठी, पैज आणि इच्छाशक्ती या तीन गोष्टींचा काय संबंध ? तर या गोष्टींचा संबंध या पोस्ट पुरता आहे.. आणि ही पोस्ट ला लिहिताना मला माझा पुढील मार्ग सापडला ... 

रविवारी  दुपारी जेवण उरकल्यावर मी माझ्या आई बाबा आणि परिवारासोबत गप्पा / चर्चा करायला बसले होते. अचानक बोलता बोलता माझं लक्ष माझ्या बाबांच्या हाताकडे गेलं. त्यांच्या बोटातली अंगठी वाकली होती. आणि बोटाला घट्टपणे बसली होती...
साहजिकच मी त्यांना प्रश्न विचारला .." बाबा ही अंगठी काढता येते का? " .
त्यांनी पुढे काही सांगायच्या आत , मी त्यांना म्हंटल " खरच काढता येते ? "
थोडसं थांबून ते म्हणाले "का ? असं का वाटतंय तुला ? "
मी त्यांना सांगितलं कि मला वाटतंय की ती घट्ट बसलीये आणि सहजपणे  नाही काढता येणार. 
मग ते मला म्हणाले "ठीक आहे, कर प्रयत्न , बघ निघते का "
हे तर सरळ आव्हान होतं. आता सगळे माझ्या आणि बाबांकडे बघत होते. दरम्यान बाबा गमतीत मला म्हणाले " पैज जिंकलीस तर दहा रुपये बक्षीस आणि हरलीस तर  दहा रुपये द्यायचे " आणि आता मी काय करणार या कडे सर्वांचं लक्ष होतं.

मी आव्हान स्वीकारलं. मी सांगितलं " ठीक आहे... मी नक्की काढून दाखवेन " आणि मी प्रयत्न सुरु केला. पण काही केल्या अंगठी निघेना... निघणं तर दूर पण साधी हलत पण नव्हती. एक...दोन नाही पूर्ण पाच मिनिटे मी प्रयत्न चालू ठेवला.... थोडी निघत होती असं वाटलं तर मी तिला परत बोटात घातली.... आणि मला एका क्षणासाठी वाटलं हे काय निरर्थक आहे.... ही अंगठी तर निघणारच नाही.. मी बाबांकडे बघितलं... ते शांतपणे बघत होते मी काय करतेय ते... सगळेच शांत होऊन बघत होते. त्या क्षणी मला असं वाटलं कि सांगावं कि हि अंगठी माझ्याने निघणार नाही. आणि जवळपास मी बोलणारच होती की मी हरले....पण मग मनाशी निर्धार केला कि आता काही झालं तरी मी हरले हे सांगायच्या आत एकदा पूर्ण प्रयत्न करायचा.. आणि मी पुन्हा माझे प्रयत्न चालू केले.

हळू हळू बोटातल्या बोटात माझ्या हाताने अंगटीला गोल गोल फिरवायला आणि वरच्या दिशेने फिरवायला चालू केलं. मला कळेना कि अंगठी वर येते पण आहे कि जागच्या जागी फिरतेय... पण तरी प्रयत्न चालू ठेवला... हळूहळू अंगठी वर येत होती अंगठी हाताच्या पेरा पर्यंत वर काढण्यात मला यश आला होतं. मग पुन्हा हळू हळू गोल फिरवायला चालू केलं.... आणि पाचव्या मिनिटांत अंगठी बोटा बाहेर...... किती आनंद झाला मला.. की मी ठरवलं ते पूर्ण केलं.

मी बाबांकडे बघितलं .... ते मला म्हणाले "शाब्बास ! तुझ्या इच्छाशक्तीने काढून दाखवलीस तू , मला माहित होतं कि ही अंगठी वाकली असेल तरी काढता येते,.. यातला गमतीच भाग सोडलास तरी .... अंगठीचे हे उदाहरण नेहमी लक्षात ठेव.... तू पाच मिनिटे सगळे विचार बाजूला ठेऊन तुझा पूर्ण लक्ष अंगठी काढण्यावर केंद्रित केलंस आणि तू सफल झालीस ..... आपण आयुष्यात देखील असंच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष घातलं तर नक्की सफल होऊ... जेंव्हा आपल्याला वाटत कि एखादी गोष्ट अडकली आहे आणि ती होणार कि नाही याची आपल्याला शाश्वती नसते , तेंव्हा आपण आपल्या पूर्ण इच्छाशक्तीने आणि पूर्ण जोमाने प्रयत्न केले तर आपल्याला असं दिसते कि ती एकेकाळी असाध्य वाटणारी गोष्ट साध्य झालेली आहे.. आणि अशा वेळी जो आनंद होतो तो खरा आनंद असतो... तुझ्या सर्व इच्छा आणि अडकलेली कामे पूर्ण करण्याचा हाच मार्ग आहे..  इच्छाशक्ती आणि भरपूर प्रयत्न  !! आणि बघ यश मिळेलच :) " 

मला बरेच वेळा आश्चर्य वाटते ..कसे काय आई बाबांना मला नक्की काय हवंय ते कळते...बाबांनी अचूकपणे मला हवा असलेला सल्ला दिला आणि ते देखील अगदी साध्या सरळ उदाहरणाने.

सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

वडाले तलाव - पनवेल

पनवेल एस.टी स्थानकापासून १० मिनिटे अंतरावर वडाले तलाव आहे. जेंव्हा आम्ही पहिल्यांदा नवीन पनवेल वरून old पनवेलला bridge ओलांडून आलो तेंव्हा हे तलाव दिसले होते. तेंव्हाच ठरवलं होतं एकदा इथे परत यायचं.  नवीन पनवेलचा bridge ओलांडल्यावर सरळ जो रस्ता जातो तो थेट वडाले तलावाच्या दिशेने जातो. 
तलावाच्या भोवताली बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. कदाचित पावसाळ्यात तलाव पाण्याच्या पातळीमुळे अधिक चांगले दिसत असावे. तलावाच्या काठावर महादेव मंदिर आहे. तलाव स्वच्छ नसले तरी अगदी खराब देखील नाही. या तलावात छोट्या प्रमाणावर मासेमारी होते. वेगळ्या जातीचे पक्षी बघायला मिळाले. सोबत काही फोटो शेयर करीत आहे.

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

सोन्याची संधी कि संधीचे सोने ....

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? 
काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " 
आणि मोठ्याने
हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला .... 
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
 माझी चार लोकात खिल्ली
उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!
मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..
आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "


सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे....

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

कविता -१

ही  कविता whats app वर share म्हणून आली होती. खूपच आवडली म्हणून ब्लॉगवर share करायचं ठरवलं.
A nice poem by Mangesh Padgaonkar....

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!

शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने आपणच भरायची,
 कारण ते आपलंच कर्म असतं...!

होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!चूक झाली तरी
फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!

 नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं

आहात तुम्ही 'सावरायला'
म्हणुन 'पडायला' आवडते,
आहात तुम्ही 'हसवायला' म्हणुन
'रडायला' आवडते, आहात तुम्ही 'समजवायला' म्हणुन
'चुकायला' आवडते,

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "सगळे ''म्हणुन
 मला  "जगायला"  आवडत...!!"