शनिवार, २५ एप्रिल, २०१५

अंगठी, पैज आणि इच्छाशक्ती ......

पोस्ट चे शीर्षक वाचून वेगळे/ विचित्र वाटले असेल ना ?  अंगठी, पैज आणि इच्छाशक्ती या तीन गोष्टींचा काय संबंध ? तर या गोष्टींचा संबंध या पोस्ट पुरता आहे.. आणि ही पोस्ट ला लिहिताना मला माझा पुढील मार्ग सापडला ... 

रविवारी  दुपारी जेवण उरकल्यावर मी माझ्या आई बाबा आणि परिवारासोबत गप्पा / चर्चा करायला बसले होते. अचानक बोलता बोलता माझं लक्ष माझ्या बाबांच्या हाताकडे गेलं. त्यांच्या बोटातली अंगठी वाकली होती. आणि बोटाला घट्टपणे बसली होती...
साहजिकच मी त्यांना प्रश्न विचारला .." बाबा ही अंगठी काढता येते का? " .
त्यांनी पुढे काही सांगायच्या आत , मी त्यांना म्हंटल " खरच काढता येते ? "
थोडसं थांबून ते म्हणाले "का ? असं का वाटतंय तुला ? "
मी त्यांना सांगितलं कि मला वाटतंय की ती घट्ट बसलीये आणि सहजपणे  नाही काढता येणार. 
मग ते मला म्हणाले "ठीक आहे, कर प्रयत्न , बघ निघते का "
हे तर सरळ आव्हान होतं. आता सगळे माझ्या आणि बाबांकडे बघत होते. दरम्यान बाबा गमतीत मला म्हणाले " पैज जिंकलीस तर दहा रुपये बक्षीस आणि हरलीस तर  दहा रुपये द्यायचे " आणि आता मी काय करणार या कडे सर्वांचं लक्ष होतं.

मी आव्हान स्वीकारलं. मी सांगितलं " ठीक आहे... मी नक्की काढून दाखवेन " आणि मी प्रयत्न सुरु केला. पण काही केल्या अंगठी निघेना... निघणं तर दूर पण साधी हलत पण नव्हती. एक...दोन नाही पूर्ण पाच मिनिटे मी प्रयत्न चालू ठेवला.... थोडी निघत होती असं वाटलं तर मी तिला परत बोटात घातली.... आणि मला एका क्षणासाठी वाटलं हे काय निरर्थक आहे.... ही अंगठी तर निघणारच नाही.. मी बाबांकडे बघितलं... ते शांतपणे बघत होते मी काय करतेय ते... सगळेच शांत होऊन बघत होते. त्या क्षणी मला असं वाटलं कि सांगावं कि हि अंगठी माझ्याने निघणार नाही. आणि जवळपास मी बोलणारच होती की मी हरले....पण मग मनाशी निर्धार केला कि आता काही झालं तरी मी हरले हे सांगायच्या आत एकदा पूर्ण प्रयत्न करायचा.. आणि मी पुन्हा माझे प्रयत्न चालू केले.

हळू हळू बोटातल्या बोटात माझ्या हाताने अंगटीला गोल गोल फिरवायला आणि वरच्या दिशेने फिरवायला चालू केलं. मला कळेना कि अंगठी वर येते पण आहे कि जागच्या जागी फिरतेय... पण तरी प्रयत्न चालू ठेवला... हळूहळू अंगठी वर येत होती अंगठी हाताच्या पेरा पर्यंत वर काढण्यात मला यश आला होतं. मग पुन्हा हळू हळू गोल फिरवायला चालू केलं.... आणि पाचव्या मिनिटांत अंगठी बोटा बाहेर...... किती आनंद झाला मला.. की मी ठरवलं ते पूर्ण केलं.

मी बाबांकडे बघितलं .... ते मला म्हणाले "शाब्बास ! तुझ्या इच्छाशक्तीने काढून दाखवलीस तू , मला माहित होतं कि ही अंगठी वाकली असेल तरी काढता येते,.. यातला गमतीच भाग सोडलास तरी .... अंगठीचे हे उदाहरण नेहमी लक्षात ठेव.... तू पाच मिनिटे सगळे विचार बाजूला ठेऊन तुझा पूर्ण लक्ष अंगठी काढण्यावर केंद्रित केलंस आणि तू सफल झालीस ..... आपण आयुष्यात देखील असंच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष घातलं तर नक्की सफल होऊ... जेंव्हा आपल्याला वाटत कि एखादी गोष्ट अडकली आहे आणि ती होणार कि नाही याची आपल्याला शाश्वती नसते , तेंव्हा आपण आपल्या पूर्ण इच्छाशक्तीने आणि पूर्ण जोमाने प्रयत्न केले तर आपल्याला असं दिसते कि ती एकेकाळी असाध्य वाटणारी गोष्ट साध्य झालेली आहे.. आणि अशा वेळी जो आनंद होतो तो खरा आनंद असतो... तुझ्या सर्व इच्छा आणि अडकलेली कामे पूर्ण करण्याचा हाच मार्ग आहे..  इच्छाशक्ती आणि भरपूर प्रयत्न  !! आणि बघ यश मिळेलच :) " 

मला बरेच वेळा आश्चर्य वाटते ..कसे काय आई बाबांना मला नक्की काय हवंय ते कळते...बाबांनी अचूकपणे मला हवा असलेला सल्ला दिला आणि ते देखील अगदी साध्या सरळ उदाहरणाने.