मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

नव्याने रुजताना .....

दरवर्षी मी  मे महिन्यात आंब्याच्या बाटा (कोय) वाळवते आणि पावसाळा सुरु होण्याआधी त्या बाटा रुजवते. (पूर्वीच्या पोस्टची लिंक).  यावर्षी देखील मी बाटा वाळवून, बाजूला प्लास्टिक पिशवी मध्ये काढून बाल्कनी मध्ये ठेवल्या. जून महिन्यात पनवेलला गेलो होतो, तेथून माती आणली. पण बाटा रुजत घालायला शक्य झालं नाही. दरवेळी काहीतरी वेगळच काम यायचं. आणि रविवार पटकन जायचा.

रोज इतर झाडांना पाणी घालताना ती पिशवी आठवण करून द्यायची माझ्या राहिलेल्या कामाची. आज करेन, उद्या करेन असं म्हणता एक, दोन नाही चांगले चार महिने उलटले आणि आज मुहूर्त मिळाला. आज ठरवलं आणि मातीची पिशवी, कुंडी आणि आंब्याच्या बाटांची पिशवी सगळं बाहेर एकत्र केलं.

आंब्याच्या बाटांची ती पिशवी जेंव्हा उघडली तेव्हा आश्चर्य वाटलं ...तीन बाटांना कोंब आले होते आणि पानं सुद्धा आली होती. माती आणि पाणी नसताना देखील बाटांना कोंब आलेला होता. कदाचित पावसाळ्यात हवेत दमटपणा असल्याने बाटांना पूरक वातावरण मिळालं असेल. क्षणभर वाईट वाटलं , यावर्षी उशीर झाला रुजवायला. पण नंतर ते कोंब बघून नवल वाटले.

त्या बाटांमध्ये सकारात्मता दिसली. परिस्थिती प्रतिकूल असताना देखील सकारात्मक आणि आशावादी असणे हेच जीवन आहे असं वाटलं. 

यावर्षी नऊ बाटा / आंब्याच्या कोयरी लावल्या. आणि बऱ्याच दिवसाचं अपूर्ण काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं.

बाटा मातीत रुजवण्या आधी घेतलेले फोटोस शेयर येथे शेयर करत आहे -


ता.क - आज त्या रोपाचा काढलेला फोटो (२ दिवसात झालेली वाढ )-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा