शनिवार, २७ जुलै, २०१३

माहिती आषाढी एकादशीची .......

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी. सर्व एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणाहून लाखो भाविक आणि वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत या दिवशी पंढरपूर विठ्ठल मंदिरात एकत्र येतात . पंढरपूरच्या वारीचा प्रत्येकाने एकदातरी आवर्जून अनुभव घ्यावा असा मला वाटतं. एक वेगळचं तेज आणि आनंद असतो त्या वातावरणात.

 आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून  तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणवरून  एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढी एकादशीवर पौराणिक कथा :
पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून त्याला वरदान म्हणून अमरत्व प्राप्त होते. एका अटीवर कि कोणताही देव अथवा माणूस त्याचा वध करू शकणार नाही. त्यामुळे तो शंकर, विष्णु, ब्रह्मदेव आणि इतर सर्व देवांना अजिंक्य झाला. वर मिळाल्यामुळे उन्मत मृदुमान्य देवांवर युद्धासाठी स्वारी करतो. सर्व देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत लपतात. त्या वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असेही म्हणतात.
आणि म्हणून त्या दिवसापासून एकादशीचे व्रत करण्याची प्रथा सुरु झाली. 
आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपीजातात. ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो.  भाविक हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात.
एकेमेकांना नमस्कार करण्याची वारकर्यांमध्ये प्रथा आहे. या मागचं कारण असं कि त्यांच्या मते प्रत्येक माणसात देव आहे. आणि यामध्ये स्वतःचा अहंभाव आणि मीपणा देखील नष्ट होतो व इतरांप्रती आदर वाढतो . जनजागृती देखील (वारीच्या) या माध्यमातून केली जाते. पताका, गजर , तुळशीची रोपे हे देखील वारीचे विशेष आहे. 
थोडक्यात एकमेकांना मदत करण , परस्पराविषयी आदर भावना बाळगणं, जनजागृती , देवाचे नामस्मरण करणे आणि आभार व्यक्त करणे हे सर्व काही या एकादशीमुळे शिकायला आणि अनुभवायला मिळते.

( विशेष नोंद : या लेखातील माहिती मी गुगल वर search केली असून, ती सर्व एकत्र आणि माझ्या समजण्या प्रमाणे संकलित केली आहे. काहीही आक्षेपार्य्ह आढळल्यास तसे कृपया नमूद करावे. ते त्वरित बदलले अथवा वगळले जाईल. )



२ टिप्पण्या: