शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

परत स्थिर होताना .......


यंदाचा पावसाळा गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. पाऊस आला तरी .... आणि नाही आला तरी..... प्रश्न काही सुटत नाहीत. एप्रिल मे महिन्यात प्रचंड दुष्काळ होता. मी एका गावात (बुलढाणा जिल्ह्यातील)गेली होती तिकडे महिन्यातून एकदाच पाणी यायचं त्यावेळी.... आणि आता जून-जुलै मध्ये इतका पाऊस पडलाय कि त्याच बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी ओला दुष्काळ सरकार जाहीर करेल याकडे लक्ष लावून आहेत. गेल्या वर्षी विदर्भात पाऊस फार कमी पडला होता. त्यामुळे कठीण दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
यंदा अतिवृष्टीमुळे नागपूर,चंद्रपूर, आणि इतर बऱ्याच ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. काही गावं पाण्याखाली गेलीयेत तर काही गावांचा संपर्क तुटलाय. खरंच किती प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. आणि किती प्रकारची संकट सहन करून देखील त्यांना योग्य मोबदला मिळतच नाही.

शाळेत असताना कवी कुसुमाग्रज यांची कविता होती. कवितेचं शीर्षक होतं "कणा". मनाला खूपच भावली होती ती कविता. आणि आमच्या मराठी शिकवणाऱ्या सरांनी देखील अगदी छान अर्थ समजावून शिकवली होती. त्यामुळे कायम लक्षात राहिली ती कविता. इकडे पोस्ट करत आहे ती कविता.....


‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

जेंव्हा पण ही कविता वाचते, प्रत्येक वेळी मला भावूक हवायला होतं. 
पुरामुळे कित्येक पटींनी नुकसान होते. सर्व काही नव्याने चालू करणे खूप कठीण आहे. पण शेवटी जीवनात परत खंबीरपणे उभं रहावच लागतं...दुसरा पर्यायचं नसतो ....  नव्याने आशा ठेऊन गावकरी एकत्र येऊन पुन्हा नवी सुरुवात करतात. त्यांच्या या हिंमतीला मानलं पाहिजे.       

1 टिप्पणी: