बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

शक्ती v/s विचार ........

दरवर्षी साधारण पावसाळा सुरु झाला कि शहरात माहुती हत्तींना घेऊन येतात.कधी एक माहुती आणि हत्ती असतो, तर कधी दोन माहुती आणि दोन हत्ती असतात.

(Image Source : My own Photography Blog)
 मी हल्ली रोज एक हत्ती बघतेय अगदी स्टेशनच्या गजबजलेल्या रोड वर. पावसाळ्यात ओले  झालेले खड्डेयुक्त रस्ते, प्रचंड गर्दी, बस,रिक्षा आणि गाड्यांचे traffic आणि त्यात निर्विकारपणे वाट काढत जाणारा हत्ती , माहुती ज्या दिशेने सांगेल त्या दिशेने. लोकं पैसे देतात कोणी नाणी तर कोणी नोटा, हत्ती सोंड वर करून ते त्याच्यावर विराजमान झालेल्या माहुतीला पोहचवतो. कोणी हत्तीला केळ देतो तर कोणी ऊस.एखादा चांगला दुकानदार किंवा माणूस बादलीभर पाणी देखील देतो. माहुती अंकुश देतो परत परत रस्ता मार्गक्रमण करण्यासाठी.

मला तरी त्या हत्ती कडे पाहून खूप वाईट वाटतं, अस वाटतं कि कदाचित पूर्वजन्मी त्याने काहीतरी चूक केली असावी म्हणून त्याचं असं होतंय. आणि ह्यावर  खरतर बंदी आहे. छान जंगलात राहायचं, आपल्या कळपात राहायचं, पाण्यात तुम्बायाचा असा कदाचित त्या हत्तीला पण वाटत असेल.

मी काही मोठ्या मंदिरात सुद्धा पाहिले आहे (महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील). तिकडे ते हत्तींना पाळतात. जवळपास दोन हत्ती असतात किंवा कधीतरी एकच  असतो. मी बघितले कि या हत्तींच्या एका पायाला एका लोखंडी चैन (रस्सी सदृश) ने बांधलेले असते. पहिल्यांदा जेंव्हा बघितले तेंव्हा असे वाटले कि हा हत्ती एवढा अस्जत्र आणि एवढ्याश्या चैन ने याला बांधलाय ? ही तर तो कधीही तोडू शकतो.

(Image Source : My own Photography Blog

लहानपणी सर्कॅस मध्ये हत्ती पहायची तेंव्हा पण आश्चर्य वाटायचं मग विचारलं एकदा कि हे कसं शक्य आहे ? तेंव्हा कळल कि हे  हत्ती  लहान असल्यापासून आणले जातात. लहानपणीचं त्यांच्या  एका पायाला चैनने  बांधले जाते. लहानपणी ते प्रत्येक दिवशी त्या चैन मधून मुक्त व्हायचे, त्या चैनला सोडवायचे खूप प्रयत्न करतात पण त्यावेळी त्यांच्यात शक्ती कमी असल्याने चैन तुटत नाही. त्यामुळे त्यांची अशी मानसिकता होते कि ही चैन तोडणं अशक्य आहे. ही चैन कधीच तोडू शकणार नाही हे त्यांनी (हत्तींनी) मान्य केल्यामुळे ते मोठे झाल्यावर हा प्रयत्न सोडून देतात आणि त्यामुळे नंतर  शक्ती असूनही ते ती चैन तोडू शकत नाही.

खरंच विचार आणि मानसिकता किती प्रबळ असते त्यासमोर शक्ती निष्प्रभ ठरते.
कुठेतरी असं वाटत कि बरेच वेळा आपणही त्या हत्तींसारखे बांधले गेलोय. पण या आपल्या चैन मधून आपण मुक्त होऊ शकतो. विचार किंवा मानसिकतेत थोडा बदल करून आपण स्वतःला मुक्त करो शकतो . खरच या बाबतीत आपण भाग्यवान आहोत.

(दोन आठवड्यांपूर्वी बिजली नावाची हत्तीण मुलुंड जवळ पडली आणि उठू शकली नाही. प्राणीमित्र आणि संघटना यांनी खूप प्रयत्न केले. क्रेनने उचलायचा प्रयत्न केला आणि तिला उभ करण्याचा प्रयत्न केला. राज्यात हत्तीचा डॉक्टर नसल्याने उपचार करण्यात त्रास झाला. तिचा माहुती तिची नीट देखभाल करीत नव्हता आणि खूप चालायला लावत होता. अखेर बिजलीचे निधन झाले. प्राणीमित्र आणि संघटना या आता अशा प्रकारांवर कारवाया करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. आता तरी कदाचित यावर बंदी ठोस होईल अशी आशा करायला हवी. )

(P.S : Ha lekh mi 3 aathavdya purvi lihila hota... post karayla ushir zhala.)